पत्रकारितेतला आमचा नवाब हरवला नितीन पगार !

पत्रकारितेतला आमचा नवाब हरवला नितीन पगार !

तीक्ष्ण धारेच्या नवाजखानी लेखणीचा पत्रकार! विषमतेविरुद्ध लढणारा आणि अन्यायाग्रस्तांच्या बाजूने ठाम भूमिका घेणारा खमक्या पत्रकार असलेला आमचा हा एक भाऊ आज सकाळी सकाळी काळाच्या पडद्याआड गेला. पत्रकारितेतला आमचा हा नवाब आता यापुढे आमच्यासोबत असणार नाही, ही वेदना अतिशय सुन्न करणारी आहे. राजू दादा जसा चित्रकारीतेच्या कैफात, तसा हा आमचा लहान भाऊ पत्रकारितेच्या ! वंचित, शोषित वर्गाविषयी त्याला जिव्हाळा होता. दडपल्या जाणार्‍या बातम्या खोदून काढण्यात त्याचा विशेष हातखंडा होता. कटू आणि निराशाजनक अनुभव जास्त वाट्याला आल्यामुळे त्याच्या लिखाणात काहीशी उद्विग्नता होती. पण बेबंदशाहीविरुद्ध दंड थोपटणं, चिरफाड करणं त्यानं सोडलं नाही. पत्रकारिता करताना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचं षडयंत्र ही त्याच्याविरुद्ध झालं, पण हा बधला नाही. तो योद्धा होता. त्याच्याकडं शब्दांचं क्षेपणास्त्र होतं. अशा प्रश्नांची उत्तरे शोधण्याकरता नितीनने आपली पत्रकारिता ज्या रंगमंचावर उभी केली, त्याच्या पडद्यामागं जाणं जरुरी आहे. प्रसारमाध्यमांसोबतच, रंगभूमी या माध्यमाचे भान असलेला नितीन जीवनाचे भान कसे राखू शकला नाही, याचे दुःख जास्त आहे. नाट्यकलावंत नितीन म्हणजे अफलातून असलेलं असं एक किरदार. तो पहिल्या वर्गापासून अभिनय क्षेत्रात होता. सातवीत त्याने पहिली एकांकिका लिहिली. ती बसवलीही. नवव्या वर्गात एसएमसी मध्ये रंजना चव्हाण मॅडम होत्या तेव्हा बट्ट्याबोळ नावाची एकांकिका, मनोज सर आणि सौ. भावना वहिणी ही सुतवणे जोडी होती त्यावेळची त्यांची ‘गंमत जमत’ आठवते. अशा सोळा एकांकिका लिहून.. त्यात अभिनय करून, एवढ्यावरच तो थांबला नाही, तर त्याचं दिग्दर्शनही त्याने केलं ! राज्य नाट्य स्पर्धेत, कामगार कल्याण स्पर्धेत अभिनय आणि दिग्दर्शनासाठी प्रथम पारितोषिक पटकावणारा वाशीमचा हा कलावंत ! राज्य नाट्य स्पर्धा गाजविणारा, राष्ट्रीय सेवा योजनेचे राष्ट्रीय स्तरावरचे शिबिरं गाजविणारा हा असा सच्चा रंगकर्मी! रंगमंचावर त्याचा वावर नुसता आठवूनही माझं मन थक्क होऊन जातं. ज्यांनी ज्यांनी त्याची कलात्मक अभिव्यक्ती अनुभवली आहे, त्यांनी त्यांनी नितीनला सलामच केला. पत्रकारिता करताना जो आत्मविश्वास त्याच्या चेहर्‍यावर झळकायचा, तो रंगभूमीने त्याला बहाल केलेला होता. अरेरावी करणारा, फटकळ बोलणारा वाटत असला तरीआतून तो अत्यंत हळवा होता. हा युवक बिलंदर होता. हा माणूसच कलात्मक होता. जिंदगी मे इतनी सिद्दत सेनिभाना अपना किरदारके परदा गिरने के बाद भीतालिया बजती रहे! विनम्र अभिवादन नितीन ! तू कायम आठवणीत राहशील!

© ✍️ गजानन आप्पाराव वाघ.

साध्या लग्नाची साधी गोष्ट

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments