लग्न! हा शब्द ऐकला की डोक्यात ढोल, मिरवणूक, हळद, आणि मंगलाष्टकांचा आवाज येतो. पण या सगळ्या रंगीबेरंगी चित्रात एक गोष्ट नेहमीच हरवते – ती म्हणजे सध्या लग्न जुळत नाहीत ,जुळले तर टिकत नाहीत . आपल्या समाजात लग्नाकडे पाहण्याची पद्धत अजूनही जणू एका बाजूच्या पाटीवरच अडकली आहे. मुलीचं लग्न ठरवताना मुलाकडे काय आहे, याची यादी तयार होते – पगार किती? घर आहे का? गाडी आहे का? नोकरी पक्की आहे ना? ग्रामीण भागात तर यात भर पडते – शेतजमीन किती? जनावरं किती? आणि हो, गावात नाव कसं आहे? आई-वडिलांना आपल्या मुलीचं भविष्य सुरक्षित हवं असते कारण समाजाने एकमेकांवरचा विश्वास गमावला असे म्हणायला हरकत नसावी .
हे खरं. पण जेव्हा मुलाचं लग्न ठरतं, तेव्हा चित्र उलटं होतं. मुलाच्या घरच्यांना वाटतं, “मुलगी येऊ दे, आमच्या परिस्थितीत जुळवून घेईलच!” तिच्या स्वप्नांना, करिअरला, विचारांना कुणी विचारतंच नाही.ग्रामीण भागात तर ही गोष्ट अजूनच ठळक आहे. लग्न ठरताना मुलीच्या घरच्यांना गोड बोलून, “आम्ही सगळं बघून घेऊ,” असं सांगितलं जातं. पण लग्न झालं की मुलगी जणू घरातली “सर्वकामधारी बाई” बनते. सकाळी उठून चहा, स्वयंपाक, घरकाम, सासू-सासऱ्यांची सेवा, आणि बोनस म्हणून सततच्या टिकेचा सामना! ती चहात साखर कमी झाली म्हणून ऐकते, साडी नीट नेसली नाही म्हणून ऐकते, आणि कधी कधी तर तिच्या आई-वडिलांबद्दलही अपमान सहन करते.
अर्थात याला काही अपवाद असू शकतात ..नाही असे नाही
पण मजा बघा, हेच लोक आपल्या बहिणीला सासरी कोणी काही बोललं तर गावभर ढोल बडवायला तयार होतात! म्हणजे, “आमच्या मुलीला सासरी मान मिळायलाच हवा, पण दुसऱ्याच्या मुलीने आमचं सगळं सहन करायचं!” हा काय न्याय? आजच्या मुली बदलल्या आहेत. त्या फक्त “सासरच्या सुनेच्या” चौकटीत अडकायला तयार नाहीत. त्या शिकतात, नोकऱ्या करतात, स्वतःच्या पायावर उभ्या राहतात. अलीकडच्या काही वर्षात बऱ्याच मुलीना सासू सासरे नको आहेत .“बाल्या बाल्याची आई अन बाली ,दहा बाय दहाची खोली “ हि मानसिकता आजकाल मोठ्या प्रमाणात रुजली आहे . ग्रामीण भागातही आता मुली शिक्षण घेतायत, स्वतःचं मत मांडतायत. त्यांना अन्याय सहन करायचा नाही. त्या म्हणतात, “लग्न म्हणजे माझ्या स्वप्नांचा अंत नाही, तर ती पूर्ण करण्याची जोडीदाराशी भागीदारी आहे!” पण आपला समाज अजूनही “सून म्हणजे घरकामाची मशीन” असाच विचार करतो. आणि मग जेव्हा मुली चुकीला चुकी म्हणतात किंवा गरज पडली तर नातं तोडतात, तेव्हा त्यांना “बंडखोर” ठरवलं जातं.
एकतर लग्न जुळत नाही जुळले तर टिकत नाही अशी विचित्र स्थिती निर्माण होते आहे . बऱ्याच मुलांना लग्न होऊन ऐन उमेदीच्या वयात हाताला काम किंवा रोजगार नसल्याने बरीच मुले व्यसनाच्या विळख्यात सापडत आहेत .त्या कारणाने सुद्धा संसाराची वाताहत होते . याची आकडेवारी तर याहून गंभीर चित्र दाखवते. नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरो सांगतो, दररोज सुमारे १८ स्त्रिया कौटुंबिक छळामुळे प्राण गमावतात. भारतात अजूनही बऱ्याच मुलींचं लग्न वयाच्या १८व्या वर्षापूर्वी होतं. लग्नानंतर ७० टक्क्यांहून अधिक महिलांना नोकरी सोडावी लागते. कामगार क्षेत्रात भारतीय महिलांचा सहभाग फक्त २५ टक्के आहे, तर जगात तो जवळपास ५० टक्के आहे. म्हणजे काय, आपण मुलींना शिक्षण देतो, पण त्यांच्या स्वप्नांना पंख लावायला नकार देतो. मानसशास्त्र सांगतं, जिथं नात्यात समानता नसते, तिथं ताण, नैराश्य, आणि आत्मसन्मान कमी होण्याचं प्रमाण वाढतं. पण जिथं पती-पत्नी एकमेकांना समानतेनं वागवतात, तिथं नातं टिकतं, घटस्फोट कमी होतात.लग्न म्हणजे फक्त मुलीनं जुळवून घ्यायचं आणि सासरच्यांनी बोट दाखवायचं, असं नाही. लग्न म्हणजे दोन माणसं आणि दोन कुटुंबांचं नातं आहे. जसं आपण आपल्या मुलीला, बहिणीला मान देतो, तसाच मान दुसऱ्याच्या मुलीलाही द्यायला हवा. ग्रामीण भागात तर ही मानसिकता बदलणं जास्त गरजेचं आहे. नाहीतर उद्या मुली लग्नालाच नकार देतील. आणि का नको? जर लग्न म्हणजे फक्त जबाबदाऱ्यांचं ओझं आणि अपमान सहन करणं असेल, तर कोणाला हवं असं आयुष्य?खरं सुखी वैवाहिक जीवन तेव्हाच शक्य आहे, जेव्हा लग्नाला दोन समान भागीदारांचं नातं मानलं जाईल. सून म्हणजे फक्त स्वयंपाकघरातली बाई नाही, ती एक माणूस आहे, तिचीही स्वप्नं आहेत, तिचंही आयुष्य आहे. आणि हो, जर तुम्ही तुमच्या सुनेचा मान राखाल, तर तुमच्या मुलीला सासरीही तोच मान मिळेल. म्हणूनच, लग्न ठरवताना फक्त मुलाचा पगार, घर, गाडीच नाही, तर त्याची आणि त्याच्या कुटुंबाची विचारसरणीही तपासा. कारण लग्न हे फक्त दोन माणसांचं नाही, तर दोन मनांचंही मिलन आहे!
100% खात्रीशीर उपाय म्हणजे लग्न पहा VDO
आकडेवारी आणि समाजशास्त्रीय पैलू
राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण नुसार अजूनही भारतात 20 टक्क्यांपेक्षा जास्त मुलींचं लग्न 18 वर्षांच्या आधी होतं. यातून मुलीच्या आयुष्याकडे दुर्लक्ष केलं जातं हे स्पष्ट होतं.
2011 च्या जनगणनेत असे आढळले की लग्नानंतर 70 टक्क्यांहून अधिक महिलांना नोकरी सोडावी लागते, तर पुरुषांमध्ये हा आकडा 10 टक्क्यांपेक्षाही कमी आहे.
आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या (ILO) अहवालानुसार भारतीय महिलांचा कामगार क्षेत्रातील सहभाग 25 टक्क्यांवर आहे, तर जागतिक सरासरी 47 टक्के आहे. यामागे विवाहानंतरची सामाजिक बंधने मोठ्या प्रमाणात कारणीभूत आहेत.
नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरो (NCRB) च्या 2022 च्या अहवालानुसार, कौटुंबिक छळ किंवा हुंडा-आधारित गुन्ह्यांमध्ये दररोज सरासरी 18 स्त्रिया प्राण गमावतात.
या आकडेवारीतून हे स्पष्ट होतं की लग्नानंतर मुलीच्या आयुष्याकडे एक “जुळवून घेण्याची जबाबदारी” म्हणून पाहिलं जातं.
मानसशास्त्रीय पैलू
आघात आणि ताणतणाव : लग्नानंतर सतत टीका, अपमान, आणि जबाबदाऱ्या ओझं वाटल्यामुळे स्त्रियांमध्ये नैराश्य (, चिंताग्रस्तता आणि आत्मसन्मान कमी होण्याची लक्षणं दिसतात.
दुटप्पी मापदंड : स्वतःच्या बहिणीवर अन्याय झाला तर आवाज उठवणारे, पण घरात आलेल्या सुनेवर अन्याय चालवणारे – यामुळे स्त्रियांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढते.
समानतेचा अभाव : पुरुष आणि स्त्री यांच्यात समानतेचं नातं नसल्यास वैवाहिक जीवन आनंदी न राहता संघर्षाचं बनतं. मानसशास्त्रज्ञांच्या अभ्यासानुसार, ज्याठिकाणी पती-पत्नी एकमेकांना समानतेने वागवतात तिथे घटस्फोटाचं प्रमाण 40% ने कमी असतं.
@मराठा लग्न अक्षदा टीम
Disclaimer:
खालील लेखातील माहिती सामान्य निरीक्षण, उपलब्ध आकडेवारी आणि सामाजिक अभ्यास यावर आधारित आहे. यातील काही मुद्दे सर्वसामान्य परिस्थिती दर्शवतात आणि प्रत्येक व्यक्ती किंवा कुटुंबासाठी लागू होत नाहीत. आकडेवारी (उदा., NCRB, ILO, NFHS) 2022-2023 पर्यंतच्या अहवालांवर आधारित आहे आणि ती बदलू शकते. वैयक्तिक परिस्थिती भिन्न असू शकतात, त्यामुळे वैवाहिक निर्णय घेताना स्वतःचा विवेक, समुपदेशन आणि कायदेशीर सल्ला घ्यावा.

आपल्या प्रतिक्रिया लिहा

			
			
			
			
			
https://blog.lagnaakshada.com/archives/778